धाराशिव (प्रतिनिधी)- पालक सचिव श्रीमती अंशु सिन्हा यांनी आज 16 जानेवारी रोजी दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली.या बैठकीत श्रीमती सिन्हा यांनी जिल्ह्यात झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करत यापुढेही विविध कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.तसेच प्रत्येक विभागाचा आढावा घेत असताना विभागाला असलेल्या अडीअडचणी जाणून घेतल्या.जिल्हा प्रशासनाकडूनही त्यांनी अनेक बाबींचा आढावा घेतला. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,रोहयो उपजिल्हाधिकारी संतोष राऊत,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा प्रशासन अधिकारी डोके,श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने उपस्थित होत्या.   

श्रीमती सिन्हा यांनी जिल्ह्यातील महसूल,कृषी,भूसंपादन,मुख्यमंत्री, रेल्वे प्रकल्प सद्यस्थिती,सुरत-चेन्नई महामार्ग,पी.एम.किसान,गाव तिथे स्मशानभूमी सुविधा उपलब्ध करुन देणे,शेतरस्ते,100 दिवसांचा कृती कार्यक्रम आदीचा संबंधित विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात वाटप झालेल्या पिक विम्याबद्दलही श्रीमती सिन्हा यांनी समाधान व्यक्त केले.तसेच त्यांनी यावेळी रेशीम शेतीला जिल्ह्यात उपयुक्त वातावरण आहे. रेशीम शेतीच्या माध्यमातून कोष निर्मितीत जिल्हा हा एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमात सहभागी होवून उत्पादन करु शकतो.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही यावेळी श्रीमती सिन्हा यांनी दिले.

 
Top