धाराशिव  (प्रतिनिधी) - नुकतीच महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य गरीब जनता प्रवास करणाऱ्या बसचे दर थोडेथोडके नव्हे तर एकदम पंधरा टक्क्यांनी वाढविलेले आहेत. या दरवाढीने प्रवाशांचे कंबरडे मोडले असून राज्यातील जनतेचा दिवसाढवळ्या खिसा कापण्याचे काम परिवहन खात्याच्या म्हणजेच लाल परीच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे ते दरवाढ तात्काळ रद्द करावी या एकमेव मागणीसाठी शिवसेना (ठाकरे) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तर युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ कैलास पाटील यांनी बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करीत सरकारच्या तिकीट दरवाढ निर्णयाचा दि.27 जानेवारी रोजी जाहीर निषेध केला.

एकीकडे सरकारने लाडक्या बहिणींना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत मधाची कांडी लावण्याचे सोंग केले आहे. तर दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणीं व त्याच बहिणींसह ज्येष्ठ नागरिकांच्या घरातील पुरुष मंडळींच्या बस प्रवासामध्ये एकदम चक्क 15 ची वाढ करून दिवसा ढवळ्या त्यांचा खिसा कापण्याचे काम केले आहे. ती वाढलेली रद्द वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी या एकमेव मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान मुख्य बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दुतर्फा रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकार मस्त, एसटी भाडेवाडीने जनता त्रस्त, रद्द करा, रद्द करा एसटी भाडेवाढ रद्द करा.. सेवा नाही, सुविधा नाही, फक्त जनतेची लूट आहे... लाल परीची लूट थांबवा, एसटी भाडेवाढ परत घ्या... प्रवास सुलभ करा, भाडेवाढ करू नका...आदींसह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शिवसैनिकासह ग्रामीण भागातील प्रवासी नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


एसटीची थकीत रक्कम दिल्यास भाडेवाढीची गरज नाही

सरकार नुसत्या योजना जाहीर करतोय करतंय. एकीकडे सांगतोय की हे मोफत देऊ, ते मोफत देऊ. एसटीमध्ये प्रवास करणारा हा सामान्य माणूस आहे. अशाप्रकारे भाडे वाढ करून सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाचे सरकारकडे जे देणं थकीत आहे ते देणं दिलं तर भाडे वाढ करण्याची गरज नसल्याचे सांगत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.


एसटीचे खाजगीकरण करण्यासाठी भाडेवाढ !

महायुती सरकारने इलेक्ट्रिक बसमध्ये घोटाळा केला आहे. त्यामुळे महामंडळ तोट्यात गेले. तो तोटा भरून काढण्यासाठीच प्रवाशांच्या माथी भाडेवाढ लादली. तसेच गुजरातच्या व्यापाऱ्याला बुलेट ट्रेन साठी निधी आहे. परंतू ज्या योजना सरकारने जाहीर केल्या आहेत, त्यावर पैसे खर्च करायला निधी नाही.  ई - बस ठेकेदारांच्या असल्यामुळे या बसमधील चालक हे देखील ठेकेदाराचेच असणार आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बस चालकांनी काय करायचे ? त्यांच्या रोजी रूटीचा प्रश्न निर्माण होणार असून त्यांना रोजगार देणार कोण ? विशेष म्हणजे परिवहन मंत्र्यांच्या परस्परच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भाडेवाडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सरकारला एसटीचे खाजगीकरण करायचे असल्याचा घनाघात आमदार कैलास पाटील यांनी केला.

 
Top