नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाहय वळण रस्त्यावरील ( बायपास ) सोलापूर ते हैद्राबाद जाणारी एकेरी वाहतुक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक बसवराज धरणे, शहरप्रमुख संतोष पूदाले, जेष्ठ पत्रकार विलास येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून दि. 27 जानेवारी रोजी सुरु केली. यामुळे सर्व समान्य नागरीकांतून समाधान व्यक्त होत असून आता नळदुर्गच्या घाटात होणारे आपघात आणि त्यामुळे होणारी जीवतहाणी टळणार आहे.
गेल्या दहा वर्षापासून नळदुर्गचा बाहय वळण रस्ता ( बायपास ) रखडून पडला होता, सुमारे सहा ते सात ठेकेदार हे काम सोडून निघून गेल्याने हा रस्ता होणार की नाही यात शंका होती, मात्र गेल्या सहा महीन्यापासून एस यु सी कंपनीने हे काम हाती घेतले आणि कामास सुरुवात केल्यापासून केवळ पाच महीन्यात एकेरी वाहतुकीस हा रस्ता खुला करुन दिला आहे. वास्तविक पहाता हा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय वाहतुकीस खुला करता येत नाही परंतु शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्या मुळे आणि नळदुर्गच्या घाटात आठवडयातून एक दोन आपघात होत होते ते टाळण्यासाठी हा रस्ता सुरु केला असल्याचे कमलाकर चव्हाण यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कारण नळदुर्गच्या घाटात दररोज मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती शिवाय चार ते पाच तास ही वाहतुकीची कोंडी सुटत नव्हती त्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. दरम्यान यावेळी बोलातना कमलाकर चव्हाण यांनी म्हटले की, नळदुर्ग शहरवाशीयांचा गेल्या दहा वर्षापासूनची आतुरता आता संपली आहे, नळदुर्गचा बायपास रस्ता सुरु व्हावा आणि नळदुर्गच्या घाटातील होणारे आपघात् कसे टाळता येतील या विचारात नळदुर्गकर होते, कारण या घाटात जवळपास तीनशे तरुणांचा नाहक बळी गेला आहे, त्यामुळे हे टाळण्यासाठी नळदुर्गचा बाहय वळण रस्ता चालू होणे गरजेचे होते. कंपनीची कार्यकारी संचालक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी काळजीने व वेगात काम केल्याने नळदुर्गच्या बोरी नदीवरील पूल, मुर्टा साठवण तलावाच्या ओढयावरील पूल, तुळजापूर जाणाऱ्या रोडचा उडडाण पूल ही कामे लवकरात लवकर करुन घेतल्यामुळे आज सोलापूर ते हैद्राबाद ही एकेरी वाहतुक या बाहयवळण रस्त्यावरुन सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे आता नळदुर्गच्या बसस्थानका समोर व घाटात होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार आहे.
यावेळी कमलाकर चव्हाण, माजी नगसवेक बसवराज धरणे, शहर प्रमुख संतोष पूदाले, जेष्ठ पत्रकार विलास येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून ही वाहतुक सुरु केली. यावेळी शिवसेनेचे राजुसिंग ठाकूर, सोमनाथ म्हेत्रे, नेताजी महाबोले, आतुल हजारे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार उत्तम बनजगोळे, दादासाहेब बनसोडे, डिजीटल मिडीया चे जिल्हाध्यक्ष आयुब शेख आदी उपस्थीत होते.