धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्यात येईल. नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी,मुलांना दर्जेदार शिक्षण,आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि बेरोजगारांच्या हातांना काम उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली.
दि. 26 जानेवारी रोजी 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस मुख्यालयाच्या मैदान क्र.2 येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतांना बोलत होते. या समारंभाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलीस अधिक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून सरनाईक म्हणाले, या रेल्वे मार्गामुळे श्री क्षेत्र तुळजापूर रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविकांना तुळजापूर येथे येण्याचा मार्ग सुकर होणार आहे. श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदीर विकासाचा 2100 कोटी 70 लक्ष रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून मुख्यमंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत 21 टिएमसी पाणी जिल्ह्याला सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. परंडा, भूम, वाशी, कळंब व धाराशिव तालुक्यातील 35 गावातील 14 हजार 936 हेक्टर आणि तुळजापूर,उमरगा व लोहारा तालुक्यातील 54 गावातील 10 हजार 862 हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 50 नवीन बसेस लवकरच उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सरनाईक म्हणाले. यावेळी पालकमंत्री यांना मानवंदना देण्यात आली. तर परेडचे परिक्षणही करण्यात आले.