धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.निधी खर्च करण्यासाठी केवळ 60 दिवस आता शिल्लक आहेत.तेव्हा यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामे करून निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून तो 60 दिवसात खर्च करावा,असे निर्देश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले.
दि. 26 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंत्रणांना निर्देश देतांना सरनाईक बोलत होते.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार विक्रम काळे, आमार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव, समितीचे विशेष निमंत्रित सदस्य महेंद्र धुरगुडे,नवनाथ जगताप व महेश नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्ज वाटप वेळेत झाले पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी मदत होईल. प्रत्येक शाळेत शौचालय असणे गरजेचे आहे.ही कामे तातडीने सुरु करावीत.जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्या शाळेच्या आवारात नाही.त्या अंगणवाड्याचे बांधकाम शाळेच्या आवारात सुरु करावे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.क्रीडा विभागाच्या योजनेत क्रीडा साहित्य देताना कुस्तीसाठी मॅटचा समावेश त्यामध्ये करावा त्यामुळे जिल्ह्यात कुस्तीला प्रोत्साहन देण्यास मदत होईल,असे ते यावेळी म्हणाले.
खासदार राजेनिंबाळकर, आमदार काळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील यांनी विकास कामाबाबत व पीक कर्जा संदर्भात आवश्यक सुचना केल्या. विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे यांनी केले.यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
500 वर्ष टिकेल असे विकास कामे करा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदीराचा विविध विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या आराखड्याबाबत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आज 26 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात माहिती जाणून घेतली.हा विकास आराखडा 2100 कोटी 70 लक्ष रुपयांचा आहे. जिल्हास्तरावर हा आराखडा मंजूर करण्यात आला असून तो पुढील मंजूरीसाठी 10 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी विकास आराखड्याचे सादरीकरण करताना जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी दिली. आराखडा सादरीकरण पाहिल्यानंतर पालकमंत्री सरनाईक यांनी हे विकास कामे 500 वर्ष टिकेल असे करा सांगितले.