तुळजापूर (प्रतिनिधी)- आई असेल पण माया नाही, समाज असेल पण करुणा नाही,लोक असतील पण जिव्हाळा नाही. यात ममता नसेल तर काय उपयोग. जीवनात वास्तवाचा स्वीकारने खूप अवघड आहे. दुःखाचा स्वीकार करा जशी स्थिती आहे तसे राहिले पाहीजे. ज्याला जगाने अनाथ केले, कर्माने अनाथ केले,परिस्थितीने अनाथ केले,त्या अनाथांना मायेची उब सिंधुताई सपकाळ यांनी दिली असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज यांनी केले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाई नगरीत पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या प्रसिद्ध गजलकार ममता सपकाळ यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार गुरुवर्य हभप गहिनीनाथ महाराज औसेकर आणि गुरुवर्य महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ममता सपकाळ म्हणाल्या की, ज्या कठीण परिस्थितीमध्ये माईंनी आपल्या कामाची सुरुवात केली. स्वतः ज्या हाल अपेष्टा सहन केल्या. त्या स्मशानभूमीपासून ते राष्ट्रपती भवनामध्ये मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारापर्यंत जे जे त्यांनी सोसले ते सर्व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
पुरस्काराचे स्वरूप तुळजाभवानी मातेला नेसवलेली मानाची पैठणी,कवड्याची माळ,शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे होते. पुजारी नगर फाऊंडेशनतर्फे अनाथ मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी 51 हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीत ममताताईंना देण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्कार भारती प्रदेशाध्यक्षा स्नेहल पाठक, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनूर सय्यद, मंदिर तहसीलदार माया माने,विनय सिंधुताई सपकाळ, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, शुभांगी पुजारी आदींची उपस्थिती होती. पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे, प्रास्ताविक अनिल आगलावे तर आभार डॉ.सतीश महामुनी यांनी मानले.