भूम (प्रतिनिधी)- भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी गुरुवार दिनांक 16 रोजी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेतली. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवर घेतलेल्या आक्षेपासह शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला होता. त्या विषयावर जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक बोलाविली होती. यासाठी जिल्ह्यातील ज्या ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत ते उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना बोलाविण्यात आले होते. या बैठकीनंतर मोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भूम येथील सोयाबीन खरेदी केंद्र बारदाण्या अभावी बंद आहे. येथील खरेदी केंद्र बंद असल्याने शेकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर खाजगी व्यापाऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. या ठिकाणी लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करून शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे तोपर्यत खरेदी केंद्र चालू ठेवावे अशी मागणी केली. तसेच 2024 मध्ये परांडा विधानसभा मतदार संघात अतिवृष्टी झाली होती त्याचे अनुदान शेतकऱ्यांना सरसकट वाटप करावे. तसेच ज्यांना अनुदान मंजूर आहे त्यांना त्याचे तात्काळ वाटप करावे. अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे भेटून केली.