धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील नामांकित गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत लवकरच महाविद्यालयीन युवकांसाठी नि:शुल्क विशेष गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक महाविद्यालयांमध्ये जाऊन युवकांना गझलेची बाराखडी शिकविणार आहेत.
गझल मंथन साहित्य संस्था विविध प्रयोग व अभिनव उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे. संस्थेने आता एक महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. युवकांना साहित्याची गोडी लागावी. त्यांनी लिहिते होऊन सशक्त आणि सकस लेखन करावे. महाराष्ट्रात तरुण गझलकार तयार व्हावेत, या उद्देशाने गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत ही नि:शुल्क मोहीम राबविण्याचे ठरवले आहे.
या गझल लेखन कार्यशाळेमध्ये गझल मंथन साहित्य संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड महाविद्यालयीन युवकांना गझल लेखनासाठी मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी महाविद्यालयांनी तथा युवकांनी गझल मंथन साहित्य संस्थेचे कोकण विभाग प्रमुख व गझल लेखन कार्यशाळा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ .मनोज वराडे (मो.9869336337) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील यांनी केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील युवकांनी तसेच महाविद्यालयांनी गझल मंथन धाराशिव शाखेचे अध्यक्ष श्री. अनिल ढगे व सचिव प्रा. विद्या देशमुख यांच्याशी संपर्क करावा.