धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. सुलभा देशमुख व डॉ. रेखा ढगे यांना मातोश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही कर्तुत्वान महिलांचा, मतांचा सन्मान नळदुर्गच्या माऊली रूकमाई आणि तुळसाई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होत असतो.
यंदाचे पुरस्काराचे चवथे वर्ष आहे. समाज हितासाठी कार्य करणाऱ्या माऊलींना हा पुरस्कार दिला जातो. डॉ. सुलभा देशमुख यांनी आपल्या मुलांवर तर उत्तम संस्कार करून त्यांना उच्चविभूषित केलेच परंतु त्या प्राचार्य पदावर असताना अनेक विद्यार्थ्यांवर अपत्याप्रमाणे प्रेम करून सहकार्य केल्याबद्दल त्या मुलांनाही आई प्रमाणे घडविल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला. तर डॉ. रेखा ढगे यांच्या साहित्य क्षेत्रातील सावित्रीच्या कविता या संपादनासाठी व स्त्रीभ्रुण हत्या विषयावरील त्यांच्या ऐक ना गं आई या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. आई म्हणून डॉ. रेखा ढगे यांनी स्वतःच्या मुलावरही चांगले संस्कार केले असून त्यांची दोन्ही मुलं उच्च विद्याविभूषित असून मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
पुरस्काराचे आयोजन कविता रमेशराव पुदाले, रमेशराव बाबुराव पुदाले व सुनील तुकाराम उकंडे यांनी नळदुर्गला केले होते. पुरस्कार प्रसंगी साहित्य संमेलनाचे पण भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख म्हणाल्या की, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखीन वाढलेली असून मी माझ्या कामासाठी नेहमीच कटीबद्ध आहे. तर डॉ.रेखा ढगे म्हणाल्या की, पुरस्कारासाठी आपण कधीच काम करत नाही पण मिळालेल्या पुरस्कारामुळे मात्र नक्कीच पुढील कामासाठी प्रेरणा मिळते. या दोघींना मिळालेल्या या पुरस्कारामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.