कळंब(प्रतिनिधी)-  राष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने आजच्या युवकाच्या हाती असून  युवकांनी विद्यार्थी दशेतच विधायक कार्य व श्रम संस्कार आत्मसात करून राष्ट्र विकास साधावा असे मत नॅचरल शुगर डेअरी प्रकल्पाचे समन्वयक श्रीपाद ठोंबरे यांनी व्यक्त केले. 

तालुक्यातील रांजणीच्या साई संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने घारगाव येथे 'समृद्ध भारतासाठी  युवक व डिजिटल साक्षरता हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साजेद चाऊस, नॅचरल शुगरचे मनुष्यबळ अधिकारी समीर सय्यद, घारगावचे सरपंच हिम्मतराव साळुंके, प्राचार्य जे.सी.गवळी, डॉ.यू.डी.घोलप आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे जग एक खेडे झालेले आहेफ परंतु आज खेडी ओस पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून नवी संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम अत्यंत ऊर्जादायी आहे. युवकांनी सामाजिक जाणीव व संवेदनशीलता जोपासून गाव आणि राष्ट्र समृद्ध करावे असे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य साजेद चाऊस, समीर सय्यद यांची भाषणे झाली. या शिबिराची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजनाने व खराट्याने गाव स्वच्छ करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विभागाचे समन्वयक प्रा. ए. डी. जाधव, प्रा एन. एम.चाऊस,प्रा एम. के.साबळे, प्राध्यापिका पी.जी. मोरे, एम. आय. शिंदे, डी. एल. शेळके, बी.डी.लांडगे,एस एच शेख, रवी गायकवाड आदीसह विद्यार्थी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल साळुंके यांनी केले. तर प्रास्ताविक ए. डी.जाधव यांनी केले. तर आभार रवी गायकवाड यांनी मानले.

 
Top