धाराशिव (प्रतिनिधी)- सर्व खेळाडूंनी अतिशय जिद्द व चिकाटीने यश मिळवून राज्यस्तरीय पदकावर आपले नाव कोरले आहे. या सर्व खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आगामी काळात होणाऱ्या स्पर्धेसाठी हे यशस्वी खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार, ही जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट असून खेळाडूंचे हे यश सर्वांसाठी स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायी आहे. असे मत भाजप नेते तथा धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल सबज्युनिअर वयोगटात सई साप्ते हिने सुवर्णपदक, आनंदी शिंदे व पार्थ साप्ते यांनी कांस्यपदक तर कॅडेट गटात ओमप्रसाद निंबाळकर यांने सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार नितीन काळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी, क्रीडा मार्गदर्शिका शुभांगी रोकडे, स्पर्धा विभाग प्रमुख प्रताप राठोड, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे, कुस्ती मार्गदर्शक गणेश साप्ते, देवा नायकल,अरुण पेठे आदींसह खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.