धाराशिव (प्रतिनिधी)- खरीप 2024 मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होवूनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली होती. त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आधार ग्राह्य धरून सततच्या पावसाच्या निकषात बदल करत राज्य नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या. त्यावर सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. अहवाल सकारात्मक असून तो सचिवांकडे सादर झाला असल्याने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख 81 हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारने 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे.परंतु याच कालावधीत धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील 24 महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असताना प्रचलित निकषांमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती व त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले असताना मदतीपासून वंचित रहावे लागले आहे.कांही मंडळात सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टी असतानाही त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे 2022 साली ओढवलेल्या आपत्तीवेळी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरून केलेली प्रक्रिया अनुसरून उर्वरित महसूल मंडळाना अगदी त्याचप्रमाणे तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी देखील आपण पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांना केली होती, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
आपण व्यक्तिशः अनेक गावात महसूल व कृषी अधिकाऱ्यांसह नुकसानीची पाहणी केली होती. पाहणीदरम्यान सलग पाच दिवसांत कमी-जास्त असा मिळून 50 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे पूर्ण नुकसान झाले असतानाही 'सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान 10 मिलीमीटर पाऊस झाल्यास“ या प्रचलित निकषात बसत नसलेल्या महसूल मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत अशा शेतकरी बांधवांना नुकसानीपोटी दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुकूलता असल्याने व वस्तुनिष्ठ पंचनाम्याच्या आधारे तयार केलेला सकारात्मक अहवाल मदत व पुर्नवसन सचिवांकडे सादर झाला असल्याने मदतीचा मार्ग मोकळा झाला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.