धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव रेल्वे स्थानक ते उपळा उड्डाणपुलापर्यंत जोडणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच धाराशिव रेल्वे स्टेशनचा अमृत योजनेअंतर्गत विकास सुरू असून, त्या कामाचाही दर्जा समाधानकारक नसल्याचे आढळले. या पाहणीत रेल्वे विभागाच्या सिव्हिल विभागाचे उप अभियंता अजय सिंग, कनिष्ठ अभियंता दीपक सिंग तसेच आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
निकृष्ट कामाच्या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याचे काम परत करून चांगल्या दर्जात करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच स्टेशनच्या विकासकामांसह अन्य कामांची पुनःश्च पाहणी करूनच संबंधित कंत्राटदारांना बिले अदा करावीत, असे निर्देशही देण्यात आले. या कामांसाठी केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. मात्र, कामाचा दर्जा खराब असल्याने हा निधी वाया जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे यासंबंधी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास प्रत्यक्ष फोटोग्राफ आणि व्हिडिओ सादर करून कंत्राटदारांना कामाची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना देण्याची मागणी केली जाणार आहे.