धाराशिव (प्रतिनिधी) - येथील श्रीपतराव भोसले जुनियर कॉलेजची मान्यता रद्द करण्यात यावी. अशी मागणी अमजद खाजामिया सय्यद यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.29 जानेवारी रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आली आहे की, धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये अमजद सय्यद यांचा मुलगा रेहान इयत्ता बारावी कॉमर्स मध्ये शिक्षण घेत आहे. प्रवेश घेतेवेळी प्राचार्य घार्गे व संस्था चालक यांनी फीबाबत काहीच सांगितले नव्हते. त्यानंतर परीक्षा फॉर्म भरते वेळी अचानकपणे दहा हजार रुपये फीस भरा अन्यथा तुमचा परीक्षा फॉर्म भरला जाणार नाही असे सांगितले. त्यावेळी इकडून तिकडून उचलणारी घेऊन चार हजार रुपये भरण्यात आले होते. त्यानंतर परीक्षेचा फॉर्म भरून घेतला सध्या बारावीमधील विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सुरू असून रेहान सय्यद यास हॉल तिकीट असल्याशिवाय परीक्षेला बसू देत नाही असे सांगितले. तर राहिलेली फीस दिल्याशिवाय हॉल तिकीट देण्यास नकार दिला व फीससाठी मानसिक त्रास करून अपमानित केले. सय्यद यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे संस्थेने आकारलेली मनमानी फीस भरू शकत नसल्याची गंभीर बाब संस्थाचालक व प्राचार्य यांच्या निदर्शनास आणून दिलेले असताना देखील विशेष हेतूने संस्थाचालक व प्राचार्य हे सय्यद व त्यांच्या मुलाला वारंवार मानसिक त्रास करून अपमानित करीत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हित बघत नसून केवळ बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून आर्थिक लुटमार करीत आहेत. त्यामुळे सदर संस्थेची शैक्षणिक मान्यता तात्काळ रद्द करून सदर संस्थाचालक व प्राचार्य यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात यावा. तसेच त्या विद्यार्थ्याचे तात्काळ हॉल तिकीट देण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा माझ्या मुलाचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा सय्यद यांनी दिला आहे.