धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेत आणखी नवीन 50 बस देण्यात येतील. गाव तेथे बस सोडण्यासाठीही उपाययोजना करण्यात येतील अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. तसेच खिळखिळ्या झालेल्या बसचा प्रश्नही सोडवण्यात येईल व गाव तेथे बस ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर शनिवारी पालकमंत्री सरनाईक हे प्रथमच धाराशिव येथे आले. त्यांनी यावेळी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी जिल्ह्ाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होती. 

पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, मी धाराशिवला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सातत्याने येत असतो. तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने मला मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. सुरूवातीला मी धाराशिव जिल्ह्याचे प्रश्न समजून घेवून त्यावर काम करणार आहे. परिवहनमंत्री या नात्याने जिल्ह्याला लवकरच नव्या कोऱ्या 50 बस उपलब्ध करणार आहे. जिल्ह्यास राज्यात जुन्या बसचा प्रश्न महत्वाचा आहे. पूर्वी सुधाकर परिचारक अध्यक्ष असताना एसटी महामंडळाची परिस्थिती चांगली होती. तशी परिस्थिती मी तयार करण्यासाठी प्रयत्न कणार आहे. सध्या महामंडळाकडे 14 हजार 300 बसेस आहेत. दरवर्षी महामंडळाकडे पाच हजार बबस घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. यामुळे पाच वर्षात 25 हजार बस ताफ्यात दाखल होतील. यादरम्यान किमान जुन्या सात हजार बस भंगारात काढण्यात येतील. सध्याही 30 ते 40 टक्के बस जुन्या झाल्या आहेत. नवीन बस दाखल झाल्यानंतर गाव तेथे बस ही संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न सफल होतील. 

 
Top