नळदुर्ग (प्रतिनिधी)- सोलापूर हून मुरुमकडे जाणारी मोटारसायकल बाभळगाव च्या पुलावरून पडल्याने यात दोन महिलांसह एक पुरुष पाण्यात बुडून मरण पावले असल्याची घटना सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी दुपारी उघडकीस आली.
या बाबत अधिक माहिती अशी की, शनिवार किंवा रविवारी रोजी आयुब महमद नदाफ, रेश्मा हुसेन होटगी, जया लक्ष्मण कांबळे सर्व राहणार आनंद नगर मुरूम, तालुका उमरगा हे तिघेजण मोटारसायकल क्रमांक एम एच 13 सी इ 0810 ने सोलापूरहून मुरूम कडे जात असताना बाभळगाव तालुका तुळजापूर येथील मध्यम प्रकल्पाच्या केरुर नदीच्या पुलावरून मोटारसायकल पाण्यात पडली असल्याचा अंदाज आहे. दरम्यान सोमवार रोजी दुपारी तीन मृतदेह पाण्यावर तरंगत असताना लोकांना दिसून आले. सदरील घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटना स्थळी पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे व पोलिस कर्मचाऱ्यासह दाखल झाले. या नंतर तिन्ही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान बराच वेळ मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मोटारसायकलच्या क्रमांकावरून मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे करीत आहेत.
दरम्यान पुलाला संरक्षक कठडा नसल्याकारणाने रात्रीच्या वेळी दिसले नसल्याने पुलावरून मोटारसायकल पाण्यात पडली असल्याचा अंदाज नागरिकांतून व्यक्त होत आहे,त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे, पुलाला संरक्षक कठडा असता तर हा अपघात झाला नसता अशी चर्चा नागरिकांतून होत होती.