उमरगा (प्रतिनिधी)- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस हैद्राबाद मुक्ती संग्रामातील दक्षिण भारतातील पहिले बलिदान देणारे गुंजोटी येथील हुतात्मा वेदप्रकाश यांचे नाव देण्यात यावे यासाठी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्याबद्दल गुंजोटी आर्यसमाज संघटनेच्या वतीने सोमवार (दि.२७) हुतात्मा वेदप्रकाश यांची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला. आर्य समाज संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला महारष्ट्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव चौगुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी गुंजोटी आर्यसमाजचे उपप्रधान म्हाळप्पा दूधभाते, उपमंत्री विश्वनाथ कदेरे, नारायण बेळमकर, श्रीमंत चौधरी, विष्णू खंडागळे, तन्मय शेटगार यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून गुंजोटी आर्य समाज संघटनेच्या वतीने सातत्याने ही मागणी करण्यात येत होती. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच पत्रक काढून उमरगा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस तालुक्यातील गुंजोटी येथील हैद्राबाद मुक्ती संग्रामातील दक्षिण भारतातील पहिले बलिदान देणारे हुतात्मा वेदप्रकाश यांचे नाव देण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच नामांतराचा निर्णय जाहीर केला आहे.


 
Top