उमरगा (प्रतिनिधी)-भारतीय जनता पक्ष हा देशात सर्वात मोठा पक्ष असून जगात सर्वात जास्त सदस्य संख्या या पक्षाची आहे. तरुणांनी सदस्य नोंदणीत सहभागी होऊन हे अभियान गावागावात राबवावे. संपूर्ण महाराष्ट्रात उमरगा-लोहारा तालुक्यातून जास्तीत जास्त सदस्य करावेत. याचा फायदा नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होईल. त्यामुळे उमरगा-लोहारा तालुक्यातून जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करावी असे आवाहन उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी केले.
मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी (दि.16) आयोजित भाजपा सदस्यता नोंदणी महाअभियान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, माजी पंचायत समिती सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, रितेश जाधव, गौस शेख, सुजित शेळके, अप्पू गुंजोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी योगेश राठोड, सचिन पाटील, रफिक तांबोळी, अरबाज शेख, निर्मलकुमार लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. श्रीराम पेठकर म्हणाले की, सध्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप या सोशल मीडियाचा वापर करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक युवक हा भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. पुढे बोलताना शरण पाटील म्हणाले की, आम्ही सदस्यता नोंदणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी उमरगा-लोहारा तालुक्यात डिजिटल फलक लावण्यात आलेले व्हॅन पाठवत आहोत. 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल करा व सदस्य नोंदणी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशाल कालेकर, ओम चव्हाण, जगदीश बनसोडे, रुद्र वेदपाठक, यश राठोड, शुभम चव्हाण, प्रवीण चव्हाण, नितीन पवार, अभय पाटील, हर्ष जाधव, आलिम मुजावर, वाशिम शेख, यश चव्हाण, विवेकानंद चौधरी, किशोर कारभारी, अमोल कटके, भूषण पातळे, प्रशांत बेंडकाळे आदींनी पुढाकार घेतला. यावेळी उमरगा-लोहारा तालुक्यातील युवक-युवती बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी तर आभार राजूभाई मुल्ला यांनी मानले.