धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढविणार आहे. त्याकरिता जिल्ह्यात गाव तेथे समता परिषदेची शाखा, घर तेथे समतासैनिक अभियान राबविण्यात येत आहे. लवकरच 100 शाखा जिल्ह्यात स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हास्तरीय आढावा बैठक रविवार, 12 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीस समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत, जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ॲड. सुभाष राऊत म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी छगनराव भुजबळ हे रस्त्यावर उतरून नेहमीच आंदोलन करीत आहेत. समता परिषद ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी महाराष्ट्रातील मोठी संघटना आहे. मराठवाड्यात संघटनेची ताकद आणि संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण आठही जिल्ह्यात आढावा बैठक घेण्यात येत आहे.

संघटना मजबूत करण्यासाठी गाव तेथे समता परिषदेची शाखा आणि घर तेथे समतासैनिक अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत समता परिषद उतरणार आहे. यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस समता परिषदेचे जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी तसेच समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top