धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी धाराशिव आगाराची पाहणी केली. यावेळी बसस्थानकातील प्रवासी महिला, विद्यार्थ्यांनी बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत. तीन-तीन तास प्रतिक्षा करावी लागते. अशी कैफियत मांडली. परिवहन मंत्र्यांनी ही गंभीर बाब आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बसेस वेळेवर सोडाव्यात, दर 5 मिनिटांनी उद्घोषणा करावी, अशा सुचना दिल्या.
पालकमंत्री प्रताप सरनाईक शनिवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. सायंकाळी धाराशिव आगारास भेट दिली. त्याचे स्थानकात आगमन होताच शिवसैनिकांच्यावतीने जेसीबीने पुष्पवृष्टी करून व क्रेनने हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी कार्यकर्त्यांचा सत्कार स्विकारून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बसस्थानकास भेट दिली. यावेळी मुली, महिलांनी त्यांना निवदेन देवून बसेस वेळेवर सोडण्याची मागणी केली. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, शेड उभारण्यासाठी आपण कोट्यवधी खर्चतो, महिलांना तात्पुरत्या स्वरूपात स्वरूपात स्वच्छतागृह व्यवस्थित उपलब्ध करा, स्वच्छता राखा अशा सुचना दिल्या.