धाराशिव (प्रतिनिधी)- 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभार पुढे आणण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार धिरज देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अग्निवेश शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून, राज्य घटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकीचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे. मतदार याद्यामध्ये घोटाळा याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मताची वाढ कशी झाली? मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे. असा प्रकाराचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी राजाभाऊ शेरखाने, विजय वाघमारे, ॲड. जमादार, विनोद वीर, प्रकाश आष्टे, ॲड. जावेद काझी, प्रशांत पाटील, सिध्दार्थ बनसोडे, डॉ. स्मिता शहापूरकर, उमेश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.