धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी वसंतराव काळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा 2 फेब्रुवारी रोजी दहावे एकदिवसीय साहित्य संमेलन पळसप येथे होणार आहे. परिसरातील शिक्षक, साहित्यिक, शेतकरी, नागरिकांनी या साहित्य संमेलनास उपसिथत रहावे, असे आवाहन मराठवाडा शिक्षक आमदार तथा स्वागताध्यक्ष विक्रम काळे यांनी केले आहे.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठाण, किसान वाचनालय पळसप व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेमलनाचे आयोजन केले जाते. संमेलनाबाबत माहिती देण्यासाठी आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषद घेतली. या प्रसंगी माजी कुलगुरू मधुकर गायकवाड, प्राचाय डॉ. हरिदास फेरे, प्रा. अंकुश नाडे, राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते.
संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आसाराम लोमटे असणार आहेत. तर उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे, साहित्यिक विलास सिंदगीकर यांची उपस्थिती राहणार आहे. संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मुल्ये या विषयावर परिसंवाद दुपारी 1.30 ते 3 या वेळेत होणार आहे. दुपारी 3 ते 4.30 या वेळेत कथाकथन, 4.30 ते सायंकाळी 6 वेळेत कवी संमेलन होईल.