धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाचे काम अडीच वर्षात पूर्ण करायचे असून, अतिशय जलद गतीने काम सध्या चालू आहे. धाराशिवमधील रेल्वेचे जंक्शन स्टेशन हे सांजा रोडवर होणार आहे. त्यामुळे हे स्टेशन मोठे आहे. अशी माहिती भाजपाचे माजीमंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकारांना दिली.
शनिवार दि. 4 जानेवारी रोजी धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाच्या कामापैकी धाराशिव-तुळजापूर या रेल्वे मार्गाचे काम पत्रकारांना दाखविण्यात आले. यावेळी रेल्वेचे अभियंता, अधिकारी, संबंधित कंत्राटदार व परिसरातील नागरिक उपस्थित होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामासंदर्भात काही सुचना केल्या. पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी सदर कामाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असून, कोणत्याही प्रकाराचा निधी या कामासाठी कमी पडणार नाही. तुळजापूर ते सोलापूरमध्येही दोन टप्पे करण्यात आले असून, दोन्ही टप्प्यातील कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, सुनिल काकडे, अभय इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते.
सांजा रेल्वे स्टेशन जंक्शन होणार
सांजा रस्त्यावरील रेल्वे स्टेशन शिंगोली रेल्वे स्टेशनपेक्षा मोठे असणार आहे. हेच रेल्वे स्टेशन जंक्शन राहणार आहे. या रेल्वे स्टेशनवरून लातूर, नांदेड, नागपूर रेल्वे जाण्यासाठी एक वेगळा ट्रॅक पूढील रेल्वे ट्रॅकला जोडण्यात येणार आहे. तर पुणे-मुंबईसाठीही या स्टेशनवरून शिंगोली स्टेशनमार्गे रेल्वे रवाना होतील. अशी माहिती संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
जुन्या रेल्वे स्टेशनचे महत्व कमी करून नका
उपळा, शिंगोली या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देवून हे रेल्वे स्टेशन उभारले आहे. आमच्या भाव-भावना संबंधित रेल्वे स्टेशनशी निगडीत आहेत. रेल्वे स्टेशनचे सध्या नुतनीकरण व आधुनिकीकरण होत असतानाच या रेल्वे स्टेशनचे महत्व कमी न होण्यासाठी सांजा रोडवरील होणाऱ्या जंक्शन रेल्वे स्टेशनप्रमाणेच या रेल्वे स्टेशनवरूनही लातूर-नागपूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे सोडण्यात यावेत. अशी आमची मागणी आहे.
संजय घोगरे, उपळा
मुकेश नायगावकर, शिंगोली.