धाराशिव (प्रतिनिधी)- वेळ अमावस्या दिवशी दि.30 डिसेंबर रोजी घरातील सर्व मंडळी शेतात गेल्याचा गैरफायदा घेत घरावरील पत्रे उचकटून घरात प्रवेश करून एकाने घरातील कपाटात ठेवलेले मनी मंगळसूत्र, झुबे, फुले, बोरमाळ अशा प्रकारचे 4 लाख 66 हजार रुपयांचे 9 तोळे सोन्याचे दागिने घेऊन एका चोरट्याने भर दिवसा दुपारी दोन वाजताच धूम ठोकली होती. मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून त्या चोरत्यास अवघ्या तीन तासात जेरबंद करून त्याच्याकडून व सराफाकडून चोरलेले सोन्याचे सर्व दागिने हस्तगत केले.  

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील प्रदीप तानाजी शिंदे ये व त्यांच्या घरातील सर्व मंडळी वेळ अमावस्या असल्यामुळे शेतात घराला कुलूप लावून गेली होती. विशेष म्हणजे सर्व गाव शेतात गेल्यामुळे गावात  विशेषतः घराजवळ कोणीच नसल्याचा फायदा घेत वाघोली येथीलच अमोल वसंत गाडेकर (वय 40 वर्षे) याने घराचा पत्रा उचकटून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले मनी मंगळसूत्र, बोरमाळ, कानातील फुले झुबे व इतर विविध प्रकारचे दागिने असा नऊ तोळ्याचा माल चोरून नेला होता. गावात कोणी नसल्यामुळे आरोपी गाडेकर याने थेट एका सराफाच्या दुकानात जाऊन ते दागिने मोडले देखील होते. मात्र आंबील घरीच विसरल्याने शेतातून शिंदे यांचे ड्रायव्हर गाडी घेऊन परत अंबिल नेण्यासाठी घरी आल्यानंतर घरातील सामानाची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी प्रदीप शिंदे यांना याची माहिती तात्काळ सांगितली. या प्रकरणी प्रदीप शिंदे यांनी ताबडतोब धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तपासीक अंमलदार महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांनी सिताफीने केला. त्यांनी

 घरफोडीच्या प्रकरणात अमोल वसंत गाडेकर याला विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने चोरी केल्याचे कबूल केले. तसेच चोरी केलेला माल एका सराफाकडे विक्री केल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गाडीला संबंधित सराफाच्या दुकानात नेऊन सराफाकडे असलेले चोरीचे दागिने केवळ तीन तासांच्या आत हस्तगत केले. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.एन. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांच्यासह एएसआय रोकडे, पोहेकॉ घुगे, पोना सावंत, पोकॉ केंद्रे व चालक बनाळे व सुरवसे यांच्या पथकाने केली.


 
Top