धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर धाराशिव येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा तिसरा दिवस. पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी  गावामध्ये श्रमदान केले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये होत असलेल्या आनंद मेळाव्याला भेट दिली.  दुसऱ्या सत्रामध्ये "संशोधन, विद्यार्थी आणि इंटरनेट" या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. के. पी. हावळ विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, धाराशिव हे प्रमुख वक्ते तर डॉ. व्ही. एच. शिंदे, व्यवस्थापनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, धाराशिव अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनामध्ये संशोधनाचे महत्व विषद केले. संशोधनामुळे मानवाचा सायकल पासून ते इलेक्ट्रिक बाईक पर्यंत झालेला बदल त्यांनी उदाहरणांसह विषद केला. संदर्भ कशाप्रकारे शोधायचे, तसेच येणाऱ्या काळामध्ये संशोधन पेपर आपल्याला इंटरनेट वर कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकतात या बाबतीत मार्गदर्शन केले.  अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. व्ही. एच. शिंदे यांनी संशोधनातून व्यवसाय स्टार्ट अप,  कशाप्रकारे रोजगार निर्मिती साठी पोषक आहे, या बाबतीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमीत शिंदे यांनी केले तर आभार गुलशन सरवदे यांनी व्यक्त केले.

तिसऱ्या सत्रामध्ये नाट्यशास्त्र वा लोककला विभागाच्या सहकार्याने मुंशी प्रेमचंद लिखित "कफन" या रचनेवर नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सदरील सादरीकरण डॉ. गणेश शिंदे व डॉ. उषा कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले, तसेच या नाटिकेमध्ये अनिकेत पारसवार, रोहित कुमार, आयुषी जिना, सुमित कुमार ठानांबीर, महेश चोखट, विलास पडवळ, सुप्रिया पंडित यांनी कलाकार म्हणून भूमिका सादर केल्या.

 
Top