धाराशिव (प्रतिनिधी)- सोयाबीन खरेदीची मुदत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवावी. तसेच सोयाबीनसाठी बारदाना ताबडतोब उपलब्ध करून द्यावा व शासनाने हमीभावाप्रमाणे तूर खरेदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे शुक्रवारी (दि.24) जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री. दुधगावकर यांनी म्हटले आहे की, मराठवाड्यात खरिपामध्ये सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 90 टक्के सोयाबीनची पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामध्येच सोयाबीन काढलेली आहे. पावसाळ्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झालेले असून सोयाबीनमधील आर्द्रता थंड हवामानामुळे कमी होत नाही. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची 29 खरेदी केंद्र कार्यरत असताना गेल्या 27 दिवसापासून बारदानाअभावी खरेदी बंद होती. त्यामुळे सोयाबीन खरेदी मुदत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढविण्यात यावी. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून मागील वर्षात 12 हजार रुपये प्रति क्विंटल तूर विक्री होत असताना आजमात्र त्याचे भाव सात हजारावर येऊन ठेपलेले आहेत. यामुळे शेतकयांना प्रति क्विंटल चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यामध्ये तूर हमीभाव केंद्र चालू करावेत व शेतकयांचे आर्थिक नुकसान टाळावे. वरील मागणीचा प्रामुख्याने विचार करून संबंधितांना आदेशित करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनात दिला आहे.