धाराशिव (प्रतिनिधी)- शैक्षणीक वर्ष 2025-26 मध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना 25 टक्के प्रवेश देताना बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित शाळेमध्ये 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता पालकांनी 27 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर भरण्याची प्रक्रिया पुर्ण करावी.मॅपने गुगल पालकांनी एकच ऑनलाईन अर्ज भरावा.तो भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे अंतर अचूक नोंदवावे.निवास पत्ता,जन्मदिनांक, जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,फोटो आयडी,दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी माहिती अचुक व खरी भरावी.चुकीची माहिती भरल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशासाठी विचारपुर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी . 

पालकांनी ऑनलाईन कागदपत्रके अपलोड करु नये.वंचित गटामध्ये : - अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,वि.जा.(अ) भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड),इतर मागासवर्ग ( OBC),विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गातील,दिव्यांग व अनाथ बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे.तसेच एच.आय.व्ही. बाधित / एच.आय.व्ही.प्रभावित बालकांचाही समावेश करण्यात आलेला आहे.

मागासवर्गीय बालकांसाठी वडीलाचा किंवा बालकांचा जातीचा दाखला तहसिलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांचा असावा. परराज्यातील जातीचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही. दुर्बल गटामध्ये - बालकांच्या पालकांचे अर्थिक वर्ष 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदाराचा दाखला तसेच पगाराचा दाखला कंपनीचा किंवा मालकाचा ग्राह्य धरण्यात येईल.

निवासी पुरावा - 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरीता रेशनिंग कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स,वीज / टेलिफोन देयक,प्रापर्टी टॅक्स देयक / घरपटटी, मतदान ओळखपत्र,पासपोर्ट व राष्ट्रीयकृत बँक पासबूक यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यात येईल.

स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदनीकृत भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा 11 महिण्याचा किंवा त्यापूर्वीचा जास्त कालावधीचा असावा. भाडे करारनामाचे ठिकाणी बालक / पालक राहत नसल्यास पालकांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. जन्मतारखेचा पुरावा  - ग्रामपंचायत / न.प. / म.न.पा. / अंगणवाडी/बालवाडीतील दाखला व पालकांचे स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल.

दिव्यांग बालकांसाठी जिल्हा शल्यचिकीत्सक / वैद्यकिय अधिक्षक यांचे 40 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र अनाथ बालकांसाठी बालसुधारगृहाची कागदपत्रके आवश्यक आहेत.घटस्फोटीत महिलाबाबत न्यायालयीन निर्णय / न्यायप्रविष्ट प्रकरण पुरावा तसेच बालकांच्या आईचे इतर अभिलेखे.विधवा महिलेबाबत पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र व इतर अभिलेखे. 

पालकांनी अर्ज भरताना एकल पालक ( सिंगल पॅरेंट) (विधवा,घटस्फोटीत व आई अथवा वडील या पैकी कोणताही एक ) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल.

पालकांना ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त होताच अलॉटमेंट लेटर पालकांच्या लॉगिनवरून स्वतः प्रत घेवून गट शिक्षणाधिकारी कार्यालय पडताळणी समितीकडे अर्ज व सहपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत. पात्र असल्यास गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेमध्ये प्रवेश निश्चीत करावा.तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न रहाता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे व याबाबतच्या माहितीचा लाभ घ्यावा.यासंदर्भात काही अडचणी असल्यास गटशिक्षण कार्यालयाशी /शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.पाटील यांनी केले आहे.

 
Top