नळदुर्ग (प्रतिनिधी) - मैलारपूर (नळदुर्ग) येथील पावणे दोन महिन्यांचा मुक्काम संपवून श्री खंडोबा मूर्तीचे दि. 23 जानेवारी (गुरुवारी) पहाटे पाच वाजता अणदूर मंदिरात आगमन होणार आहे.
अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाची मंदिरे आहेत. विशेष म्हणजे, मंदिरे दोन असली तरी मूर्ती मात्र एकच आहे! अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने देवाचा मुक्काम असतो. मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाची पौष पौर्णिमा यात्रा सोमवार दि. 13 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. श्रद्धा, भक्ती आणि परंपरा यांचे प्रतीक असलेल्या या यात्रेत 1 हजार नंदीध्वजांसह अणदूर आणि नळदुर्गची मानाची काठी यांचा समावेश होता. जवळपास पाच लाख भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले.
येत्या रविवारी (19 जानेवारी) रोजी श्री खंडोबाची शेवटची मिनी यात्रा भरणार आहे. त्यानंतर अष्टमी करून नवमीच्या पूजेला श्री खंडोबा अणदूरकडे प्रस्थान करणार आहेत. दि. 22 जानेवारी रोजी रात्री दोन्ही गावांच्या (अणदूर-नळदुर्ग) मानकऱ्यांमध्ये लेखी करार व मानपान होऊन देवाचे पालखीतून अणदूरकडे प्रस्थान होईल. दि. 23 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता श्री खंडोबाचे अणदूर येथे आगमन झाल्यानंतर अणदूर येथील महिला श्री खंडोबाचे औक्षण करतील. तसेच भाविक वाजत गाजत मूर्ती मंदिरात नेऊन प्रतिष्ठापना करतील. हा सोहळा पाहण्यासाठी अणदूरचे ग्रामस्थ उत्सुक आहेत. यावेळी शोभेचे दारूकाम होणार आहे. “आमचा खंडेराया परत अणदूरला येणार!“ म्हणून घरासमोर सडा-रांगोळी करून, हातात दिवट्या घेऊन येळकोट येळकोट जयघोष करणार आहेत. हलगीच्या तालावर वारू नाचणार आहेत. अशा प्रकारे अणदूर गाव श्री खंडोबाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.