धाराशिव (प्रतिनिधी)- येडशी अभयारण्यात दिसलेला वाघ आता बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी तलावाच्या परिसरात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आढळून आला आहे. यावर वनविभागाची करडी नगर असून, तीन तालुक्यातील अधिकारी वाघाचा 15 ट्रॅप कॅमेऱ्याच्या आधारे मागोवा घेत आहेत. परिसरातील गावात वाघ शिरणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे. वाघ मागील चार दिवसापासून त्याच परिसरात आहे. पांढरीला हल्ला केला. त्यानंतर गुरूवारी येडशी परिसरात वाघ आढळून आला. त्यामुळे वाघ त्याच परिसरात फिरत असल्याचे दिसतेय. चार दिवसांत दुसऱ्यांदा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयरण्यातून दाखल झालेल्या वाघाचा येडशी अभयारण्याच्या परिसरात मुक्त संचार होत असल्याचे दिसत आहे. पाच दिवसापूवी एक गाईवर हल्ला केल्यानंतर वाघ आल्याचे समोर आले होते. त्या दृष्टीने वन व वन्यजीव विभागाने ट्रॅप कॅमेरे लाऊन शोध घेतला असता येडशीच्या अभयारण्यात वाघ दिसून आला होता. आता अभयारण्याच्या परिसरात असलेल्या बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी तलावाच्या पसिरात वाघ असल्याचे कॅमेऱ्यात दिसून आले आहे. यावरून वाघ गेल्या पाच ते सहा दिवसापासून याच भागात मुक्त संचार करत असल्याचे समोर आले आहे. भक्ष्याच्या शोधात आलेला वाघ आलेल्या मार्गे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला पकडण्याबाबत निर्णय झालेला नाही. वनविभाग केवळ वाघावर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठस्तरावरून पकडण्याचे निर्देश दिल्यानंतर पकडण्याची कारवाई होवू शकते.