धाराशिव (प्रतिनिधी)- एनएचएआय आणि आयआरबी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे रखडलेल्या सर्विस रोडचे काम एका विद्यार्थ्याचा अपघातात बळी गेल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून केलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे अखेर पूर्ण झाले आहे. धाराशिवकरांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून पोदार स्कूल, डी-मार्टमध्ये खरेदीसाठी जाणारे ग्राहक आणि इतर नागरिकांची या सर्विस रोडमुळे सोय झाली आहे. त्याचबरोबर महामार्गालगत रेल्वे स्टेशन ते तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत दोन्ही बाजूच्या सर्विस रोडचे काम देखील तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पोदार इंग्लिश स्कूलमधील अर्णव अजय सोनवणे या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर धाराशिवकरांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांना निवेदन देऊन रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. दि. 12 डिसेंबर रोजी धाराशिवकर नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक तसेच विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन डी-मार्टसमोर तब्बल दीड तास रास्तारोको आंदोलन केले. सर्विस रोड 15 दिवसाच्या आत करून द्यावा त्याशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे जमिनीवर पाय आलेल्या एनएचएआय आणि आयआरबी कंपनीच्या प्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेऊन 25 डिसेंबरपर्यंत पोदार स्कूल ते जुना उपळा रोडपर्यंत सर्विस रोडचे काम पूर्ण करुन देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. एनएचएआय आणि आयआरबी कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनानुसार 21 डिसेंबरपर्यंत सर्विस रोडचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पोदार स्कूल, डीमार्ट आणि जुना उपळा रोड या भागातील अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.
नागरिकांनी सर्विस रोडचा वापर करावा
नागरिकांनी सर्विस रोडचा वापर करावा. राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करू नये. सध्या पोदार स्कूल, डी-मार्ट आणि जुना उपळा रोड भागात सर्विस रोडचे काम पूर्ण झाले असले तरी एवढ्यावरच हे आंदोलन थांबणार नाही. रेल्वे स्टेशन ते तेरणा इंजिनीरिंग कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचा सर्विस रोड 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून आवश्यक ठिकाणी गतिरोधक व पथदिवे तसेच विकास नगर येथील अंडरपासचे काम कामे पूर्ण करावे आणि जुना उपळा रोड येथील अंडरपाससाठी संबंधीत विभागाकडे रीतसर प्रस्ताव पाठवावा.
सोमनाथ गुरव
शहरप्रमुख, शिवसेना