नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यात पवनक्की कंपन्यांनी धुमाकुळ माजवला असून शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन दबाव तंत्राचा वापर करुन शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोल भावात खरेदी करुन पवनचक्की उभारण्याचे कामे करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ठप्प पडली आहे. परिणामी शेतकरी या कंपन्यांच्या त्रासाला कंटाळला असून पवनचक्की कंपन्यांचे फार मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

तुळजापूर तालुक्यात गेल्या एक वर्ष भरापूर्वी पासून रिन्यु पवनचक्की कंपनी ने पाय पसरले आहे. ग्रामीण भागात स्थानीक दलालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव टाकून किंवा कंपन्यांच्या बाउंन्सर च्या दबावामुळे शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमीन खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. आणि या जमीनीवर मोठया प्रमाणात पवनचक्की प्रकल्प उभारले जात आहेत. हे पवनचक्की उभारताना अनेक शासकीय नियमांची पायमल्ली संबंधीत कंपनीकडून होत असल्याच्या तक्रारी ही सध्या वाढत आहेत. या प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश मोरडे व विजयकुमार ठाकूर यांनी धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदवारे मागणी केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांवर मनमानी करुन कवडी मोल किमतीने तीस वर्षाच्या करारावर जमीनी खरेदी करणे, एका पवनचक्की मनोऱ्या साठी सुमारे सात एकर जमीन ही अकृषी लागते. मात्र हा नियम धाब्यावर बसवून कंपनीने मोठया प्रमाणात तुळजापूर तालुक्यात पवनचक्कीचे मनोरे उभा केले आहेत. दरम्यान या मनोऱ्याच्या उभारणीसाठी मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतजमीनीमधून त्या शेतकऱ्यांवर दबाव टाकून रस्ते करुन त्या ठिकाणहून वाहने घेवून जाणे, या ठिकाणी मोठया प्रमाणात रातोरात मुरुम टाकून रस्ता तयार करणे, शिवाय याची रॉयल्टी ही संबंधीत विभागाला न भरता असा प्रकार दिवसे दिवस कंपनीचा चालू आहे. असे ही या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या या आन्यायाला वाचा फोडणारा खंबीर नेता आता तरी सध्या पूढे येत नाही, त्यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. स्थानिक दलालाच्या मार्फत आणि कंपनीच्या बाउन्सर च्या दबावाला अनेक शेतकरी बळी पडत असून भविष्यात तालुक्यातील शेतकरी शेती करण्यासाठी शिल्लक राहील की नाही अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधीत प्रशासकीय यंत्रणा या बाबतीत सखोल चौकशी करुन शासकीय नियमांची पायमल्ली करुन जर पवनचक्कीचे मनोरे उभे केले असतील तर संबंधीत कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ही तालुक्यातून जोर धरत आहे. तुळजापूर तालुक्यात सध्या मुर्टा, होर्टी, चिकुंद्रा, मानमोडी, अणदुर, हगलूर, बसवंतवाडी, तीर्थ, बारुळ, मेसाई जवळगा, हंगरगा तुळ, किलज आदी गावातील शिवारात जवळपास 50 पेक्षा ही जास्त पवनचक्कीचे मनोरे उभे केले आहेत. आणखीन ही हे पवनचक्कीचे मनोरे उभारणीचे कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या मुळावर उठणाऱ्या या कंपनीवर कारवाई होणे गरजेचे आहे.

 
Top