नळदुर्ग (प्रतिनिधी)-  वागदरी ता. तुळजापूर येथील लोकनियुक्त सरपंच सौ. तेजाबाई शिवाजीराव मिटकर यांनी शासनाकडून मिळालेला वर्षभराचा पूर्ण पगार गावच्या विकासासाठी ग्रामसेवक यांच्याकडे सुपूर्त केला. दरम्यान या निर्णयाचे गावकऱ्यामधून कौतुक केले जात आहे.

गेल्या वर्षीच वागदरी येथील ग्रामपंचायतीची निवडणुक झाली, या निवडणुकीत सौ. तेजाबाई शिवाजीराव मिटकर व त्यांचे पूर्ण पॅनेल या निवडणुकीत निवडुन आले. लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या निवडुण आल्या आहेत. त्या सरपंच पदाची सुत्रे हाती घेताच गावात त्यांनी शासनाच्या वेगवेगळया फंडातून कोटयावधी रुपयेची विकास कामे करुन घेतली आहेत. गेल्या वर्षीच कामाचे भूमीपूजन केले आणि त्याच कामाचे लोकार्पण सोहळा ही त्यांनी पार पाडला आहे. गावामध्ये मुख्य रस्त्याचे कांक्रीटीकरण करणे, स्मशान भूमी विकसीत करणे, बंद पडलेल्या हातपंपाची दुरुस्ती करणे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेची रंगरंगोटी, दलित वस्ती येथे व्यायामशाळा बांधकाम करणे, गावात वृक्ष लागवड करणे, संगणक कक्ष उभारणी, सौर उर्जा लँम्प, गावातील सार्वजनिक टाक्यांना व गावातील नळांना मुबलक पाणी उपलब्ध करून देणे, त्याच बरोबर 44 लाख रुपयेच्या विहीरी, दहा लाख रुपयेचे भीमनगर येथे सभागृह बांधकाम करणे, 47 लाख रुपयेची जलजीवन योजना राबविणे ग्रामदैवत भवानसिंग महाराज मंदीरासाठी पर्यटन विभागाकडून दहा लाख रुपयेचा निधी मंजूर करुन घेणे, त्याच बरोबर पुणे येथील धरती डेव्हलपर्स यांकडून 600 एकरवर सोलार प्लॅन्ट उभारणीचे काम हाती घेतले आहे. या साठी 300 एकर जमीनीचे संपादन करण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होईल. दरम्यान मिटकर यांचे सुपूत्र पोलिस प्राधिकरण उमाकांत मिटकर यांनी चार धाम यात्रेसाठी दिलेले 25 हजार रुपये त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सुशोभीकरणासाठी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या कामामुळे ग्रामस्थातून व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 
Top