धाराशिव (प्रतिनिधी)-  कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था या समाजासाठीचे खरेखुरे आदर्श आहेत. असे प्रतिपादन लोकसेवा समिती धाराशिव संस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रध्देय कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने लोकसेवा समिती धाराशिव या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकसेवा पुरस्कार 2024 वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 

याप्रसंगी लोकसेवा समितीचे डॉ. अभय शहापूरकर, कमलाकर पाटील, शेषाद्री डांगे, सुषमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा पुजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. समाजात निरपेक्ष वृत्तीने कार्य करणाऱ्या परंतु प्रसिध्दी पासून दूर राहत समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरु ठेवणाऱ्या व्यक्तींचा व त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे 15 वे वर्ष आहे.  यंदाचे लोकसेवा पुरस्कार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन व्यक्तींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, साडी, श्रीफळ, बुके असे आहे.

गोवर्धन निवृत्ती दराडे, रामकिसन काशिनाथ सोळंके, मीराताई दत्तात्रय मोटे  यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन लोकसेवा समितीच्या वतीने अत्यंत मानाचा असा लोकसेवा पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या छाननी समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ॲड. मुकुंद पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कमलाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी यांनी सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

 
Top