धाराशिव (प्रतिनिधी)- महायुतीच्या नवीन सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली आहे. गेल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या डॉ.तानाजी सावंत यांनीही यावेळी मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. परंतु भाजपचे राणाजगजितसिंह पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजप त्यांना मंत्री देईल अशी अपेक्षा जिल्हावासियांना होती.
जिल्ह्यातील चारपैकी तुळजापूर आणि परंडा या दोन मतदारसंघातून महायुतीचे दोन आमदार निवडून आले आहेत. तुळजापूरमधून निवडून आलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना होता. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. आमदार राणा पाटील यांनी जिल्ह्यातील भाजप वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा भाजपने तुळजापूरची जागा मिळवली आहे. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे.
डॉ.सावंत यांनाही मंत्रिपद नाकारले
भूम- परंडा मतदारसंघाचे आमदार डॉ.तानाजी सावंत हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी आहेत. तसेच ते मागच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. मात्र भाजपच्या विरोधामुळे त्यांना यावेळी मंत्रिपद नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. सावंत यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त झाल्यामुळे मंत्रीपद नाकारल्याची चर्चा आहे.