धाराशिव (प्रतिनिधी)- सत्य, धर्माच्या बाजूनेच परमेश्वर असतो. धर्म रक्षणासाठीच परमेश्वरांनी अवतार घेतला असे प्रतिपादन हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी केले.

त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्री दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त धाराशिव येथील शांतिनिकेतन कॉलनी येथे श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री दत्तगुरू जन्मोत्सव गुरूचरित्र पारायण- भजन- कीर्तन सप्ताह सोहळ्याची  रविवारी (दि.15) काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटपाने उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी हभप महादेव महाराज यांनी पाहती गौळणी, तवती पालथी दुधाणी.. या गवळणीवर कीर्तन सांगत प्रभूंच्या लहानपणींच्या लिलांची माहिती सांगितली. यानंतर हभप महादेव महाराज, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या हस्ते काल्याची हंडी फोडण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे व अंजलीदेवी रणदिवे यांच्या हस्ते श्री दत्तगुरूंचे आरती-पूजन करून भाविकांना काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या वतीने हभप महादेव महाराज यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. 

सकाळी श्री दत्तगुरूंच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तेर येथील संत गोरोबाकाका वारकरी शिक्षण संस्था व वाणेवाडी येथील काका महाराज उंबरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी टाळ- मृदंगाच्या गजरात ठेका धरून उत्कृष्ट सादरीकरण केले. ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. भाविकांनी मोठ्या संख्येने या मिवणुकीत  उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सप्ताह सोहळ्यास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी भेट दिली. या सोहळ्यास  माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे, नायब तहसीलदार घृणेश्वर स्वामी, राजाभाऊ नाईकनवरे, शिवाजी जाधव, प्रभाकर चोराखळीकर, अनंत व्यास, बलराज रणदिवे, रोहित पडवळ यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताह सोहळ्यानिमित्त 9 ते 15 डिसेंबर या कालावधीत गुरचरित्र पारायण, महिला भजनी मंडळाची भजन सेवा, भजनसंध्या, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.


 
Top