धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतुक संघटना,अभिनव शाळा,व पालक यांच्या वतीने अभिनव इंग्लिश स्कूलसमोरील राज्य मार्ग क्रमांक 238 वरील रस्त्यावरील अडथळा दूर करण्याची मागणी केली आहे. शाळेसमोर सिमेंट ब्लॉक टाकून रस्ता दुभाजक बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना, पालकांना आणि स्कूल बस चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, भानुनगरमधून येणारी स्कूल बस, विद्यार्थी, सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना रस्ता बंद असल्याने रॉन्ग साईडने यावे लागते किंवा पुढे जाऊन वळण घ्यावे लागते. यामुळे शाळेच्या वेळेत वाहनांची आणि विद्यार्थी-पालकांची गर्दी वाढते. विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास करण्यास अडथळा निर्माण होतो.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संघटनेने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांना निवेदन दिले आहे. त्यात सिमेंट ब्लॉक काढून रस्ता मोकळा करावा आणि गतिरोधक तसेच झेब्रा क्रॉसिंगची चिन्हे लावावीत अशी विनंती करण्यात आली आहे. संघटना,अभिनव शाळेतील शिक्षक व पालक यांच्या या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दिलेल्या निवेदनावर अभिनव शाळेतील शिक्षक तथा संस्थाध्यक्ष मोदानी, धर्मे, गोरठेकर, महाजन, मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी म्हणून दत्ता गावाड, वैभव काकडे, दिलीप देशमुख, राहुल सूर्यवंशी, ॲड. वैभव माने, नेताजी मुळे, धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे दादा गवळी, संतोष विधाते, महादेव नाईक, मुन्ना मुळे, आप्पा कांबळे, हनुमंत मदने व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.