धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरामध्ये गेल्या 50 वर्षापासून व्यापार्‍यांच्या प्रश्नांसाठी झगडणारी संस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाने धाराशिव शहरात नवीन सभासद नोंदणीस सुरुवात केली आहे. सदर सभासद नोंदणीस व्यापारी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव शहरातील सर्व व्यापार्‍यांनी सभासद नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी केले आहे.

जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव म्हणाले की, धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघ हा राज्य पातळीवर व देशपातळीवर काम करणार्‍या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर व देशातील सर्वोच्च व्यापारी संघटना कॉफिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅट या संघटनांशी संलग्नित आहे. जिल्हा व्यापारी महासंघ धाराशिव शहरासह जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, नळदुर्ग, लोहारा, मुरुम, उमरगा तालुक्यामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून कार्यरत आहे.

सध्या धाराशिव शहरामध्ये सन 2025-26 या दोन वर्षासाठी सभासद नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. दोन वर्षासाठी नाममात्र सभासद शुल्क पाचशे रुपये ठेवण्यात आलेले आहे. यासोबत व्यापारी महासंघाचा बोर्ड देखील देण्यात येणार आहे. सध्या देशपातळीवर कॅटच्या माध्यमातून 7 कोटी व्यापारी सभासद झालेले आहेत. तरी व्यापारी बांधवांनी नवीन सभासद नोंदणी करुन घ्यावी, असेही जिल्हाध्यक्ष श्री.जाधव यांनी कळविले आहे.

 
Top