धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहराच्या पश्चिमेस असलेल्या हातलादेवी मंदिर परिसरात नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कठड्यांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. त्यामुळे मंदिर परिसराचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झाले असून भाविकांसह धाराशिवकरांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. बुधवार, दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला आहे. याबाबत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकाविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

हातलादेवी मंदिराच्या डोंगरावर भाविकांसह पर्यटक देखील मोठ्या संख्येने दररोज येतात. स्थानिकांच्या पुढाकारातून नागरिकांना बसण्यासाठी हातलादेवी मंदिर परिसरात ठिकठिकाणी कठडे बांधण्यात आलेले आहेत. परंतु अज्ञात समाजकंटकांनी या कठड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. असे समाजविघातक कृत्य करणार्‍या समाजकंटकांचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी. तसेच अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरुन यापुढे असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही, अशी मागणी सुधीर रामेश्वर पवार यांनी केली आहे. यावेळी पत्रकार आकाश नरोटे, सलीम पठाण, जफर शेख, कुंदन शिंदे उपस्थित होते.


 
Top