धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986 अंतर्गत जिल्हा कृतीदल बालकामगार समितीच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.45 वाजता येडशी रोडवरील अंबिका वडा पाव सेंटर येथे धाडसत्र राबविण्यात आले.
सदर कारवाईत वयस्कर मालक श्री. शंकर ढेकळे यांच्या आस्थापनेवर दोन बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले. त्वरित उपाययोजना करत, या बालकामगारांना जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांच्या समन्वयाने जिल्हा बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
सदर प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात शंकर ढेकळे यांच्या विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. या धाडसत्रात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चाईल्ड लाईन धाराशिव, धाराशिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस अधिकारी, आणि युवा ग्राम विकास मंडळ धाराशिव यांच्या अस्सेस टू जस्टीस प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आरोग्य विभागाचे प्रतिनिधी देखील या कारवाईत उपस्थित होते. सदर कारवाईत सरकारी कामगार अधिकारी श्री. सुधाकर कोनाळे यांनी पुढाकार घेतला. या धाडसत्रामुळे जिल्ह्यात बालकामगारविरोधी जनजागृतीला गती मिळाली असून, या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.