धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा दिवसेंदिवस नोकरीतील संधींचा आलेख वाढत आहे. नुकत्याच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी या विभागातील दोन विद्यार्थ्यांची सरळ सेवा भरती अंतर्गत जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. या पूर्वीच दोन विद्यार्थिनी याच विभागात लागलेल्या आहेत. परत एकदा स्थापत्य अभियांत्रिकीच्या सोमेश गाटे आणि वसिक पिरजादे या दोन विद्यार्थ्यांचे जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झालेले आहे. त्यांच्या यशाबद्दल नुकताच महाविद्यालयाच्या वतीने दोघाचाही सत्कार करण्यात आला .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा.शितल पवार, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, स्थापत्य अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रात नोकरीच्या संधी अनेक असून विद्यार्थ्यांनी डिग्री बरोबरच, कौशल्यावर आधारित असलेले विविध कोर्सेस महाविद्यालयांमध्ये सुरू असून तेही पूर्ण करावेत. स्थापत्य अभियांत्रिकी मधून सलग तीन-चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शासकीय नौकरी मध्ये निवडीचे प्रमाणही वाढलेले आहे. मागील दहा वर्षापासून कार्यरत असलेले तेरणा ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होत असून महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे व शासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. या दोन विद्यार्थिनींच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी दोघांचेही विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.