धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवचे उपविभागीय अधिकारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोपी करीत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
26 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांनी धाराशिव तहसील कार्यालयास अचानक भेट देवून तपासणी केली. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला असता ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. दप्तर तपासणी करत असताना कोणताही प्रकारचा फॉर्म भरून देण्यात आला नाही. यामुळे सायंकाळी 7 पर्यंत तपासणी केल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले शारिरीक व मानसिक संतुलन खराब झाल्याचा दावा केला. तर यासंदर्भात उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी तहसील कार्यालयाच्यावतीने करणाऱ्यात आलेले आंदोलन नियमबाह्य असल्याचे सांगितले. तक्रारीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयात जावून आपण दप्तर तपासणी करण्यात आली होती. त्यात कोणतेही चुकीचे केले नाही. या संदर्भातील अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना देवू असे डव्हळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.