धाराशिव (प्रतिनिधी)-  वेळ अमावस्येला शेतकऱ्यांनी काळ्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यंदाची वेळ अमावस्या सोमवार दि. 30 डिसेंबर रोजी आल्याने सोमवती अमावस्येला विशेष महत्व होते. संपूर्ण जिल्हाभरात बळीराजासह त्याच्या कुटुंबासोबतच मित्र परिवार, नातेवाईकांनी सकाळपासूनच शेतशिवारे गजबजली होती. 

आपल्या मुलाबाळांसह सहकुटुंबासाठी भरपूर धनधान्य पिकू दे, आई माझ्या कुटुंबाचा उध्दार होवू दे, अशी प्रार्थना बळीराज यादिवशी करतो. शेतकरी शेतात कोप तयार करून त्या कोपीत धान्याची व पांडवांची पुजा करतात. पुजेसाठी जांभ, हरभरा भाजी, बोर आणि लसूण व भाकरीच्या पिठापासून केलेले आंबील असते. शिवाय विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी, ज्वारी, गव्हाची खीर, बाजरीचे उंडे, पुरणाची किंवा तीळगुळाची पोळी जेवणात असते. असा नवैद्य दाखवल्यानंतर बळीराजासह सर्वजण आंनदाने शेतात एकत्र जेवण करतात. 


 
Top