धाराशिव (प्रतिनिधी)- 23 डिसेंबर हा किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त धाराशिव जिल्ह्यातून पीक भाव संरक्षण योजना राबविण्याचे प्रयत्न सुरू करणार असून, पायलेट प्रोजेक्ट म्हणून जिल्ह्यात ही योजना राबवावी अशी मागणी आपण करणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी भाजप कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस नितीन काळे, शिवाजीराव नाईकवाडी, सुरेश देशमुख, सतिश दंडनाईक, निहाल काजी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत पिकांना संरक्षण मिळून शेतकऱ्यांना न्याय मिळतो. जे उत्पादन आहे त्यावर आधारीत पीकविमा मिळतो. परंतु उत्पादन चांगले असेल आणि पिकाचा भाव कोसळलेला असेल तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पिकाचे उत्पादन आणि पिकाचा भाव या दोन्हीवर आधारीत पीक भाव संरक्षण योजना राबविण्याची मागणी आपण राज्य सरकार व केंद्र सरकारकडे करणार आहोत. गेल्या तीन वर्षातील पिकाचा भाव याची सरासरी घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळू शकते अशा प्रकारची योजना इतर देशात असल्याचे सांगून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी इन्सुरन्स प्रॉडेक्ट या नावाने ही योजना असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार पाटील यांनी काही पिकाचे जागतिक स्तरावर भाव कोसळल्यामुळे आपल्याही देशात भाव कोसळले आहेत. असे असले तरी गेल्या पाच वर्षातील भावाची सरासरी काढून पीक भाव संरक्षण योजना राबवता येईल असेही पाटील यांनी सांगितले. या संदर्भात जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामसभा घेवून या संदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात येईल असे सांगितले.
दर आठवड्याला आढावा घेणार
जिल्ह्यात पवनचक्की बाबत जी काही दादागिरी चालू आहे त्या संदर्भात प्रशासनला सुचना दिल्या असून, कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक आठवड्यात जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची जी समिती आहे त्या संदर्भातील आढावा आपण प्रत्येक आठवड्यात घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.