धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव शहरामध्ये प्रत्येक चौकात पोलीस चौकी कार्यालय करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.16 डिसेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरामध्ये रोज कोणत्या न्‌‍ कोणत्या भागांमध्ये सतत दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होत असून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जिजाऊ चौक (बार्शी नाका) हा परिसर शाळा, महाविद्यालय, दवाखाने असते व क्लासेस असल्यामुळे या ठिकाणी सतत विद्यार्थी व विद्यार्थिनींची गर्दी असते. शहरात पोलिसांचा असलेला वचक व दरारा कमी झाल्यामुळे गुंडगिरीचे पेव गल्लोगल्ली वाढले असून, याचे स्तोम जोमात दिसून येत आहे. याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या गुंडगिरी व वर्चस्वावरून भर रस्त्यात चाकू, सुरा, कोयता तर कधी कधी गावठी पिस्तूलचा देखील वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बार्शी नाका, देशपांडे स्टॅन्ड परिसर, आरपी कॉलेज परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा नगर, ख्वॉजा नगर, भवानी चौक सांजा रोड, गणेश नगर, तेरणा महाविद्यालय (एमआयडीसी), शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय व बोंबले हनुमान चौक या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यासह व फिरते स्कॉड 24 बाय 7 तास कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. जर वरील ठिकाणी पोलीस बंदोबस्त व चौकी न वाढविल्यास शहरात दिवसागणिक अनेकांच्या खुनी हल्ल्यामध्ये मुडदे पडल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी वरील बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून पोलीस बंदोबस्त वाढविण्यासह पोलीस चौक्या कार्यान्वित कराव्यात. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करील व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला आहे. या निवेदनावर धाराशिव - कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, राष्ट्रवादी युवकचे शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, शाहू धावारे, शैलेंद्र शिंगाडे, प्रज्योत बनसोडे, संतोष डोलारे, स्वराज जानराव, अमोल पवार व विकास गायकवाड यांच्या सह्या आहेत.

 
Top