उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरासाठी माकणी धरणातून समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी 185 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार प्रविण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. यापूर्वी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते याच कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यामुळे उमरगा- लोहारा मतदारसंघात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्र शासन, नगरविकास विभागाच्या 2 अभियानांतर्गत उमरगा शहरासाठी माकणी धरणातून समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी 185 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 2 आक्टोबर 2024 रोजी या कामाचे भूमिपूजन माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत ज्ञानराज चौगुले यांना पराभव झाला तर शिवसेना (ठाकरे) चे प्रविण स्वामी हे विजयी झाले. उमरगा शहरवासीयांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या माकणी धरणातून समांतर पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याच्या याच कामाचा शुभारंभ आमदार प्रविण स्वामी यांच्या हस्ते गुरुवारी (दि.12) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा बाजार समितीचे माजी सभापती एम. ए. सुलतान होते.
यावेळी व्यासपिठावर बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, शिवसेना जेष्ठ नेते बसवराज वरनाळे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तर, विजयकुमार सोनवणे, डॉ. अजिंक्य पाटील, विजय वाघमारे, प्रकाश आष्टे, नानाराव भोसले, अर्जुन बिराजदार, एम. ओ. पाटील, अजित चौधरी, विजय दळगडे, विजयकुमार नागणे, अशोक सांगवे, सतीश जाधव, विजय तळभोगे, नगरपरिषद उप अभियंता राजन वाघमारे, शेषराव भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी यांनी केले. तर सूत्रसंचालन एस.पी. इनामदार यांनी तर मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.