उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळज येथील प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाचा प्रा. रघुनाथराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवारी दि 29 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी ज्येष्ठ समाज सेवक विनायकराव पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, शेती, कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, सहकार, ग्रंथालय आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना व्यक्तींना प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय स्मृती गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री तथा वंचित आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख ह्या असणार आहेत. सोहळ्याचे दीपप्रज्ज्वलन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिपचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे आदी मान्यवरांसह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास उमरगा व लोहारा परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना सहकाररत्न, धम्मचारी प्रज्ञाजीत समाजरत्न, अय्यूब कादरी पत्रकाररत्न, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत भराटे उत्कृष्ट वाचक, भावना नान्नजकर शिक्षकरत्न, लोहारा तालुक्यातील कस्तुरबाई चव्हाण ग्रंथसेवा, नारायण चव्हाण कृषीरत्न, शिवप्रसाद लड्डा उद्योगरत्न, अर्जून, आर्यन तानाजी बिराजदार यांना क्रिडारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


 
Top