तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची जेष्ठ समाजसेविका पद्मश्री अनाथांची माई सिधुताई सपकाळ यांच्या कन्या प्रसिद्ध गजलकार ममता सपकाळ यांना पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात, जानेवारी 2025 मध्ये मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत हा पुरस्कार सपकाळ यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
पुजारी नगर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा पहिलाच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्याची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी केली. या पुरस्कार सोहळ्यासाठी संयोजक समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये संस्कार भारती, आरळी बुद्रुक महोत्सव समिती, तुळजापूर तालुका पत्रकार संघ, मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर यांचा सहभाग आहे.
ममता सपकाळ यांना हा पुरस्कार पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे सहअध्यक्ष गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर आणि श्री तुळजाभवानी मंदीराचे महंत तुकोजी बाबा यांच्या हस्ते जिजाऊ जयंतीनिमित्त 12 जानेवारीला श्रीनाथ लॉन्स येथे प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारतीच्या स्नेहलताई पाठक असणार आहेत. जेष्ठ समाजसेविका पद्मश्री अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचे शिवधनुष्य कन्या ममता सपकाळ यशस्वीतेनी पेलत आहेत. शेकडो अनाथांची ताई म्हणून हिंमतीने सांभाळ करत आहेत. त्या कार्याला बळ मिळावे यासाठी पहिलाच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार देण्यात येतो आहे.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रति वर्षी नऊ कर्तृत्ववान महिलांना गौरव करण्यासाठी मागील पाच वर्षापासून जिल्हास्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जात होते. यंदा प्रथमच राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा शक्तीपीठ तुळजाई नगरीत आयोजित करून या पुरस्काराची सामाजिक व वैचारिक उंची वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती मुख्य संयोजक अनिल आगलावे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.