धाराशिव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीसाठीच नव्हे तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अकल्पनिय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कसेकाय लागू शकतात असा प्रश्न राज्यातील नेते कार्यकर्ते यांच्यासह पत्रकार, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
ईव्हीएम संदर्भात अनेक प्रश्न व शंका सर्वांच्या मनात आहेत. 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनी काँग्रेसचे अध्यक्ष मा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी इथून पुढच्या सर्व निवडणुका मत पत्रिके वर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. समाजातील मोठ्या वर्गाचीही हीच मागणी आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान राज्यभर सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील या मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे सर्वसामान्य नागरिकांच्या सहीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, विनोद वीर, अग्निवेश शिंदे, अर्जुन बिराजदार, हनुमंत वाघमोडे, राजू तोरकडे, मेहबूबपाशा पटेल, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, ज्योती सपाटे, उमेश राजेनिंबाळकर, विजयकुमार सोनवणे, गोदावरी केंद्रे, अशोक बनसोडे, सरफराज काझी, नानाभाऊ भोसले, कफिल सय्यद, सुनील बडुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.