डॉक्टरवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी 


धाराशिव- तालुक्यातील शिंगोली येथील शांताबाई दत्तू गवळी या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयात वेळेवर औषध उपचार न केल्यामुळे जीव गमविण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही. तोपर्यंत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत प्रेत तब्बल २० तास रुग्णालयातच ठेवले. दुसऱ्या दिवशी दि.२१ डिसेंबर रोजी पोलीस अधिकारी व रुग्णालयातील डॉक्टर यांनी रुग्णालयात येऊन नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. 


नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. संबंधितावर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आम्ही येथून जाणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले. शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजी व दुर्लक्षितपणा पुन्हा चव्हाट्यावर आला  आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाची बीपी अचानक वाढली. डॉक्टर व सिस्टर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्या महिला रुग्णाचा जिल्हा रुग्णालयातील बाथरूममध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाथिकारी यांनी दिल्यानंतर प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


 
Top