धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यांतील नितळी गाव म्हणजेच पैलवानकी . पैलवानकी म्हणजेच महाराष्ट्राचा मर्दुमकी व रांगड कुस्ती खेळ . पूर्वी गाव तिथे हनुमान मंदीर . मंदीराच्या पुढे तालीम अर्थात व्यायामशाळा असायची . गावकुसातील नवयुवक वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे प्रशिक्षण घेत असत . नैसर्गिक आखीव आणि रेखीव शरीयष्टी करत होते . पहाटे पैलवानी शडुच्या धुत्काराने गावकऱ्यांची दिनचर्या चालू होत असे . तालमीतील वस्ताद सुद्धा पोटच्या पोरागत पैलवानाची काळजी घेत असे . गावोगावच्या यात्रे जत्रेच्या फडात  तालमीतील पैलवान कुस्ती जिंकल्यावर बेंबीच्या देटांपासुन हाय बघ, नितळी गावच्या डबल महाराष्ट्र चॅम्पीयन नवनाथ भाऊ वस्तादांचा हुक्कमी पट्टा ही विजयी आरोळी देत असे . नवनाथ भाऊनंतर उत्तम कदम वस्ताद झाले . दोघांनीही महाराष्ट्र पिंजून काढला . गावचं नावं महाराष्ट्रभर केले .खरं तर ही आरोळी म्हणजे वस्तादांनी विनामूल्य दिलेल्या शिकवणीची गुरुदक्षिणा होय . महाराष्ट्रभर  वेगवेगळ्या वस्तादांच्या आरोळ्या आजही आहेत . अशीच नितळी गावची परंपरा खुप मोठी होती . गावातील प्रत्येक घरात पैलवान निर्माण होत होता .कुस्ती मनामनात - पैलवान घराघरात ही संकल्पना 1999 पर्यंत जीवंत होती .प्रत्येक घरात पैलवान आणि अंगणात घरातील दुधासाठी म्हैस होती . भौतिक धनापेक्षा शरीरसंपदा सर्वश्रेष्ट होती . 

   पण पुढे झगमगत्या युगात व ज्ञानाच्या विस्फोटामध्ये सध्याचा तरुण शारीरिक विनाशाकडे जात होता. गावातल्या तालीम बंद पडून टपर्‍या निर्माण झाल्या . गोठ्यातील म्हैस जावून शेडमध्ये जर्सी गाय आली .दुधाची जागा चहाने घेतली . गावची मुले गोवा, गुटखा, धुम्रपानाकडे वळली . तालमीत दिसणारे युवा टपरीवर आणि मोबाईलमध्ये रममान होऊ लागले. गावची तरूण पिढीला मागील पैलवानकीचा वसा आणि वारसा समजावुन सांगितला . पण तालमीत येण्यास कोणीही धजत नव्हते . गावात मैदान व्हायचे पण सहा वर्षापासुन शेवटची कुस्ती बाहेरच्या पैलवानाची होत असे .गावात दोन तीन पैलवान बाकी होते  . यानंतर पुढे कोण ? गावची तालीम बंद ? पैलवानकी संपेल ? हा प्रश्न गावातील काही बोटावर मोजणार्‍या कुस्तीशौकीन व पैलवानाला सतावत होता . 

   दिवाळीत गावामध्ये क्रिकेटची प्रिमिअर लीग संपन्न झाली . आपल्या गावची ओळख पुसली जात आहे . हे ओळखुन टोकाचे कुस्तीप्रेमी विद्यानंद मडके व राष्ट्रीय पंच गोविंद घारगे, वस्ताद दादा क्षिरसागर, पै. भिमा धायगुडे यांनी आवर्जुन तालमीचा श्रीगणेशा केला . पहिल्या दिवशी दोनच मुले आले . पुढे दोनाचे चार , चाराचे आठ असे बाल कुस्तीगीर तालमीत येऊ लागले . संख्या वाढवण्यासाठी प्रलोभनार्थ अंडी, केळी, खजुर, लाडू, दुध देण्याचे सर्वांनी ठरवले . लंगोटापासून ते आहारापर्यंत गावातील प्रत्येक नागरिकांनी ऐपतीनुसार सहकार्य करत ही योजना मागील एक महिन्यापासुन चालू ठेवली . एक दिवसाचा खर्च 500 ते 600 रुपये येतो . आज शंभर दिवसाचा सत्वयुक्त पोषण आहारदात्यांची यादीपुर्ण आहे . गावातील बजरंग कुस्ती आखाड्यात सध्या 40-45 मुले नियमित कुस्ती मेहनतीचा सराव करतात . सरावानंतर पोषणासाठी सत्वयुक्त पोषण आहार दिला जातो . गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या नवोपक्रमाचे पंचक्रोशीसह क्रिडाक्षेत्रात कौतुक होत आहे . गावची नवोदित पिढी बलवान, गुणवान, चारित्र्यवान, सामर्थेवान बनवली जात आहे . गावची कुस्ती व पैलवानकी पुन्हा जीवंत झाल्याचे समाधान गावकऱ्यांना वाटत आहे . गावाची मर्दुमकी व वैशिष्ट्ये गावकर्‍यांनी जपले आहे . ही सर्वासाठी आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे . या मर्दुमकी खेळाच्या नवोपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .


 
Top